अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | साने गुरूजी यांची कर्मभूमी असणार्या अमळनेरात आगामी अखील भारतीय साहित्य संमेलन भरविण्यात येणार असून याबाबतची घोषणा आज करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात शेवटचे साहित्य संमेलन हे १९८४ साली भरले होते. यानंतर तब्बल ४० वर्षांनी जिल्ह्यातील अमळनेर येथे आगामी म्हणजेच २०२४ सालचे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजीत करण्यात येणार आहे. हे ९७ वे मराठी साहित्य संमेलन असणार आहे. आज अखील भारतीय मराठी साहित्य महामंडळाने एका पत्रकान्वये यांची घोषणा केली आहे.
या पत्रकानुसार, आगामी संमेलनासाठी औदुंबर, सातारा आणि अमळनेर या तीन शहरांमध्ये स्पर्धा होती. मात्र महामंडळाने अमळनेरची निवड केली असल्याचे यात नमूद केले आहे. अमळनेर येथे साहित्य संमेलन होणार असल्याने वृत्त येताच शहरासह परिसरातून याचे स्वागत करण्यात येत आहे. हे संमेलन जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे.