अपघातात गंभीर जखमी रुग्णास शस्त्रक्रियेद्वारे मिळाले जीवदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नशिराबाद येथील रस्त्यावर अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी रुग्णाला शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. खाजगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च परडणार नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण दाखल झाला. तेथे शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया करून यशस्वी औषधोपचार करण्यात आले. रुग्णाला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच डिस्चार्ज कार्ड देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

रावेर तालुक्यातील सावदा येथील केतन सतीश सैतवाल यांना भुसावळ रस्त्यावर वाहन चालवत असताना भीषण अपघात झाला होता. त्यावेळी प्रथमोपचार झाल्यानंतर त्यांना नाकाची गंभीर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. हा रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी कान नाक घसा शास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी तपासणी केली.

रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती साधन सामुग्री शस्त्रक्रिया गृहात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने मधून सदर रुग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. कान नाक घसा शास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी तब्बल दोन तास नाकाच्या हाडाची ही गंभीर शस्त्रक्रिया करून या रुग्णाला पूर्णतः दिलासा दिला आहे. यानंतर निगराणीखाली ठेऊन डॉक्टरांनी योग्य ते औषधोपचार केले. बुधवारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत या रुग्णास रुग्णालयातून निरोप देण्यात आला. रुग्णावर उपचार करण्याकामी विभाग प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, सहायक प्राध्यापक डॉ. निशिकांत गडपायले, डॉ. विनोद पवार, डॉ.ललित राणे, शस्त्रक्रिया गृहाच्या इन्चार्ज परिचारिका निला जोशी, कक्ष ७ च्या इन्चार्ज परिचारिका सुरेखा महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content