धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मुसळी येथे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर भाजपा नेते चंद्रशेखर अत्तरदे यांनी सहकार्य करित जखमींना खासगी वाहनाने जळगाव येथे उपचारार्थ रवाना केले.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील जुना टोल नाकाजवळ समोरासमोर दुचाकीच्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दुचाकीस्वारांना उपचारासाठी नेण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नव्हते. त्याचवेळी भाजपाचे नेते चंद्रशेखर अत्तरदे हे जळगावकडून धरणगावकडे जात असतांना अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी स्वत गाडी थांबवत जखमींची विचारसपूस केली. १०८ रूग्णवाहिकेला संपर्क केला असता ती देखील उपलब्ध झाली नाही. त्यानंतर अत्तरदे यांनी त्यांच्या मित्राच्या चारचाकी वाहनाने दोन्ही जखमी दुचाकीस्वारांना जळगाव येथे उपचारार्थ रवाना केले.