…अन त्यांनी आजीबाईंना केलेली मदत ठरली फलदायी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप असल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. असे असतांना एक ८० ते ८५ वर्षाच्या आजीबाई मुक्ताईनगर बसस्थानकावर अकोला बसची चौकशी करत होत्या. बस सेवा बंद असतांना पोलीस पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र तायडे व खासगी वाहन चालक पंकज कापले यांनी मदत केल्याने त्या सुखरूप अकोला येथे पोहचल्या.

 

आज मुक्ताईनगर बस स्थानक येथे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र तायडे हे कर्तव्य बजावत असताना तेथे वय अंदाजे ८० ते ८५ वर्षाच्या गुंफाबाई शिंदे या आजीबाई आल्या. त्यांनी श्री तायडे यांच्याकडे अकोला जाण्यासाठी गाडी आहे का ? अशी विचारणा केली. त्या इच्छापूर येथून अकोला येथे जात होत्या. श्री. तायडे यांनी बस कर्मचाऱ्यांचा आंदोलन असल्याने सर्व बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याची कल्पना आजीबाईंना दिली. बस फेऱ्या रद्द झाल्याचे समजत आजीबाई घाबरून गेल्यात. माझ्याकडे अर्ध्या तिकिटाचे पैसे आहेत मी कशी अकोल्याला जाणार ? असा प्रश्न तिने उपस्थित केला. यावेळी आजीबाई काही काळजी करू नका मी करतो काहीतरी तुमच्यासाठी असे श्री. तायडे यांनी बोलून आजीबाईना दिलासा दिला. ते लागलीच आजीसाठी नाश्ता व पाणी घेऊन आलेत. त्यांनी आजीला खाजगी वाहनात खामगावपर्यंत बसवून दिले. खाजगी वाहनाचे चालक पंकज कपले यांनी श्री. तायडे यांच्याकडून फक्त अर्ध्या तिकिटाचे पैसे घेतले. श्री. तायडे यांनी मदत केल्यानंतर आजींना सुखरूप रवाना केल्याने मनाला खूप समाधान वाटले, खरंच गरजू माणसांची मदत केली गेली पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

Protected Content