मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन प्राणवायूचे उत्पादन होत असून परराज्यातून ३०० मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा होत आहे. अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना प्राणवायूची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० टन प्राणवायूचे उत्पादन होत असून तो पूर्णपणे वैद्यकीय कारणांसाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रिक टन प्राणवायू पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले. केंद्र शासनही सुमारे ५० हजार मेट्रिक टन प्राणवायू आयात करणार असून त्या माध्यमातूनही राज्याला प्राणवायू मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तविली आहे.
पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आरसीएफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी प्राणवायूनिर्मिती होते त्याची शुद्धता ९८ टक्के असून रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना प्राणवायू देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे ३००० खाटांची भर पडणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणावर भर देण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे टोपे म्हणाले. सिरम इन्स्टिट्यूट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना प्रति डोस ४०० तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रमाणे दर आकारणार आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लशीची किंमत १५००, रशिया आणि चीनच्या लशीची किंमत प्रत्येकी ७५० रुपये असल्याचे सांगत कोविशिल्ड असो की आयात केलेली लस असो त्याचा उपयोग करून राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.