चोपडा प्रतिनिधी । अनेर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी महिन्याभरापुर्वी शेतकरी कृती समितीने तालुका प्रशासनाकडे केली होती. अद्यापपर्यंत मागणी मान्य न झाल्याने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी अनेर धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
अनेर धरणातील पाणी त्या नदीच्या काठावरील गावांच्या पिण्यासाठी राखीव आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून पाणी सोडण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही. यावर्षी प्रत्येक गावच्या विंधन विहीरी खोल जात आहेत, त्यासाठी नवीन विहिरी करायला मशीन उपलब्ध नाहीत व पाईप खोल सोडल्यास पंप काम करीत नाहीत व हा सारा वर्ग शेतकरी आहे व तो चारही बाजूने बेजार असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या काळात प्रशासनास गेल्या २६ मार्चपासून पाणी सोडण्याची विनंती करून जिल्हा परिषदने पैसे न भरल्यास पाणी सोडता येणार नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
धरणात मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यात पाण्याचे मोठ्या प्रमाणावर वाफ होते तर उरलेले पाणी पावसाळ्यात वाया जाते. याचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. महिन्याभरापूर्वी अनेर धरणातून आवर्तन सोडवे अशी मागणी करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने शेतकरी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र दिन १ मे रोजी अनेर धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा समितीचे समन्वयक एस.बी. पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.