अनिल अंबानींना पत्नीचे दागिने विकावे लागले

 

लंडन : वृत्तसंस्था । दिवाळखोरीत गेलेल्या उद्योजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. न्यायालयीन खटले लढण्यासाठी पत्नीचे दागिने विकावे लागल्याची कबुली अनिल अंबानी यांनी लंडनमधील न्यायालयामध्ये दिली आहे. करोडपती ते रोडपती असा अंबानी यांचा प्रवास त्यांचे औद्योगिक साम्राज्य खालसा झाल्याचे अधोरेखीत करत आहे.

अंबानी यांनी चीनमधील ४ हजार ७६० कोटीचे बँकांकडून कर्ज घेतल आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अंबानी यांनी बिकट आर्थिक परिस्थिती न्यायालयात कथन केली. अंबानी म्हणाले की, ”मी एक सामान्य जीवन जगत आहे. एकच गाडी वापरत आहे. आता पूर्वीसारखे माझे आयुष्य सुखासुखी राहिलेले नाही. न्यायालयीन खटल्यांचा खर्च हा पत्नीचे दागिने विकून भागवला आहे”, अशी कबुली त्यांनी दिली. मागील सहा महिन्यात पत्नीचे ९ कोटी ९० लाखांचे दागिने विकले आहेत. आता स्वतःजवळ काही ऐवज उरलेला नाही, असेही अंबानी यांनी न्यायालयाला सांगितले.

आर्थिक हलाखी कथन करताना त्यांनी माध्यमांवर खापर फोडले आहे. माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान मोटार नव्हती. आताही केवळ एकच कार आहे, असे अंबानी यांनी सांगितले. या सुनावणीत पत्नी टीना अंबानी यांच्या मालमत्तेचा तपशील मागण्यात आला. अनिल अंबानी यांना खासगी हेलिकॉप्टर , याॅट, लक्झुरी मोटार, लंडन, कॅलिफोर्निया आणि बिजिंगमधील शाॅपींगसंबधी प्रश्न विचारण्यात आले.

२० मे २०२० रोजी झालेल्या सुनावणीत यूके हायकोर्टने अंबानी यांना संपत्तीचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. १२ जून २०२० पर्यंत अंबानी यांच्यावर चीनी बँकांचे ५२८१ कोटींचे कर्ज आहे. ज्यासाठी ७ कोटी रुपये न्यायालयीन खर्च देखील त्यांना कंपन्यांना द्यावा लागणार आहे. १५ जून रोजी बँकांनी देखील अंबानी यांच्या संपत्तीचा खुलासा करण्याची मागणी केली होती.

२९ जून रोजी मास्टर डेव्हीसन यांनी अनिल अंबानी यांना जगभरातील त्यांच्या संपत्तीची विस्तृत माहिती देणारे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. या संपत्तीचे बाजार मूल्य १ लाख डॉलर (७४ लाख ) आहे. या शपथपत्रात स्वतः अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्या मालमत्तेची माहिती देण्याचे आदेश दिले होते.

त्याआधीच्या सुनावणीत अंबानी यांच्या वकिल रॉबर्ट होवे यांनी मागच्या सुनावणीत युक्तिवाद करताना भारतातील दूरसंपर्क सेवा क्षेत्रातील घडामोडींमुळे अंबानी हे देशोधडीला लागले असल्याचा दावा केला होता. वकिलाने न्यायालयाला सांगितले की, दूरसंपर्क सेवा बाजारपेठेतील विपरीत घडामोडींममुळे अंबानी आता धनाढय़ नाहीत. त्यांच्याकडे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय कुटुंबियांकडून अंबानी यांना मदत मिळणार नाही, असे अंबानी यांच्या वकिलाने कोर्टात स्पष्ट केले होते.

नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे मालक अनिल अंबानी यांच्या विरुद्ध दिवळखोरीची कारवाई सुरू केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अनिल अंबानी यांनी कर्ज घेतले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१६ साली अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इफ्राटेल या कंपन्यांना हे कर्ज दिले होते. या कर्जासाठी अंबानी यांनी १ हजार २०० कोटी रुपयांची पर्सनल गॅरेन्टी दिली होती. आता या दोन्ही कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे एसबीआयला अपील करावी लागली.

Protected Content