अणू युद्ध आणि ग्लोबल वार्मिंग : संकटांचा धोका तोंडावर

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण जग दोन हात करत आहे. मात्र, कोरोनाच्या संकटापेक्षाही आणखी भयंकर संकट ओढवणार असल्याचा गंभीर इशारा अमेरिकेतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नॉम चॉम्स्की यांनी दिला आहे. जगभरात सध्या असलेली राजकीय आणि आर्थिक परिस्थिती पाहता हे दोन संकट फारशी दूर नसल्याचे त्यांनी सांगितले. अणू युद्ध आणि ग्लोबल वार्मिंग ही दोन्ही संकटे मानवी संस्कृतीच्या विनाशाची कारणं ठरू शकतात, असेही त्यांनी म्हटले.

एका मुलाखतीत नॉम चॉम्स्की यांनी आपले मत व्यक्त केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात कोरोनाची महासाथ आली. त्यामुळे धोका अधिकच आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. त्याला मातही देऊ. मात्र, अन्य दोन संकटांचा सामना करणे अशक्यच असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या हाती एकवटत जाणारी ताकद हे या विनाशाचे मूळ कारण ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

कोरोनाच्या काळात मोठा विरोधाभास दिसून येत आहे. क्यूबा युरोपला मदत करत आहे. तर, जर्मनी ग्रीसला मदत करण्यास तयार नाही. आपल्याला नेमके कसे जग हवे आहे, याचा विचार करण्यासाठी कोरोनाने आपल्याला संधी दिली आहे. सार्स विषाणूंचा आजार काही बदलांसह पुन्हा येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. श्रीमंत देशांनी संभाव्य कोरोना आजाराच्या दृष्टीने लस शोधणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे काहीच केले नाही. मोठ्या औषध कंपन्यांनी त्यांना अडवले. आता संकट आले असताना मनमानीपणे औषधे आणि लशीचा व्यवसाय होणार असल्याचे चॉम्स्की यांनी सांगितले. संकटाची चाहूल लागली असताना औषध कंपन्यांनी नवीन सौंदर्य प्रसाधनावर भर दिला असल्याची तिरकस टिप्पणी त्यांनी केली.
नॉम चॉम्स्की यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०१९ मध्येच अमेरिकेने कोरोनासारख्या महासाथीच्या आजाराची शंका व्यक्त केली होती. मात्र, त्यावर कोणी लक्ष दिले नाही. पोलिओच्या संकटावर सरकारी संस्थांनी निर्मिती केलेल्या लशीने संपले. त्या लशीचे कोणतेही पेटंट नव्हते. अमेरिका आणि ब्रिटनने कोणत्याही देशांना मदतीचा हात दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. या संकटामुळे मानवी समाजातील उणीवा समोर आल्या आहेत. करोनाचे संकट हा इशारा असू शकतो. आणि त्याला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.

Protected Content