जळगाव प्रतिनिधी । पायी जाणाऱ्या पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास वाटीकाश्रम जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अज्ञातवाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भरत रामंचद्र सोनवणे (वय-५०) रा. कांचन नगर, जळगाव हे रिक्षा चालविण्याचे काम करतात. रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाटीकाश्रम येथील राहणारे त्यांचे मित्र मगण काळे यांच्या कडे गोंधळाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ठेवण्यात आला होता. यावेळी गोंधळाचा कार्यक्रम आटोपून ते कांचन नगरात जाण्यासाठी रात्री १० वाजता पायी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर जात असतांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी कल्पना, ललित व घनश्याम हे दोन मुले आणि विवाहिती मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ गुलाब पाटील करीत आहे.