पुणे (वृत्तसंस्था) पालकमंत्री अजित पवार यांनी फक्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. ‘हम करे सो कायदा’ असून हे बरोबर नाही. केवळ चार टक्के बाधित रुग्णांसाठी ९६ टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असे म्हणत भाजप खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे.
लॉकडाउन जाहीर करताना खासदार आमदारांच्या सूचना विचारल्या नाहीत. केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवले, त्यांचा सल्ला घेतला. मात्र तसे पुण्यात होत नसून, मनमानी कारभार असल्याचा आरोप बापट यांनी केला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र त्यांना विश्वासात घेतले जात नाही. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही. सर्व पुणे शहराला वेठीस धरले जात आहेत. या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारने बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिले नाही. यामुळे उपासमारीची भीती असून, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचे हे आम्ही ठरवू, असा इशारा देखील भाजप खासदार गिरीश बापट यांनी दिला.