यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील आसराबारी वस्तीवरील आठ महीन्याच्या बालकाचे कुपोषणामुळे जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला आहे. याप्रकरणात अखेर यावल पोलीसात नोंद करण्यात आली आहे .
या संदर्भातील पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, आसराबारी तालुका यावल येथील राहणारे जवानसिंग पावरा यांच्या आठ महीन्याच्या आकाश पावरा या कुपोषणग्रस्त बाळाचा उपचाराकरीता जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान दिनांक ३१ जुलै रोजी दुदैवी मृत्यु झाला. मृत्युच्या जवळपास २६ दिवसानंतर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनमध्ये सिआरपीसी कलम१७४प्रमाणे अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस हेड काँस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे. दरम्यान, कुपोषणामुळे आठ महीन्याच्या बालकाचा झालेला दुदैवी मृत्युच्या घटनेला जवळपास एक महीना उलटला असून देखील प्रशासनाकडुन निवळ कागदपत्रांची देवाण घेवाणच्या पलीकडे वरिष्ठ पातळीवर ठोस असे काहीही झाले नसल्याने कुपोषणग्रस्तांचे गंभीर प्रश्न हे राजकीय दबावाखाली दडपले जाणार तर नाही ना ? असे अनेक प्रश्न आदिवासी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे.