अखेर… महिलांनीच गटारीच्या स्वच्छतेला केली सुरुवात!

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील शेवरी गावात तुटूंब भरलेल्या गटारीबाबत गावातील महिलांनी ग्रामपंचायतीसह प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र प्रतिसाद शुन्य मिळत असल्याने अखेर महिलांनीच गटारीच्या स्वच्छतेला सुरूवात केली आहे.

तालुक्यातील शेवरी- माळशेवगे या ग्रृप ग्रामपंचायत येथे गेल्या चार वर्षांपासून ग्रामस्थ तुडुंब भरलेल्या गटारीमुळे त्रस्त आहेत. याबाबत नागरिकांसह महिलांनी सरपंचांसह प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून स्वच्छता करण्याबाबत विनंती केली. मात्र ग्रामपंचायतीने या गंभीर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. दरम्यान गावातील काही जागृत महिलांनी कंबर कसून व हातात फावडे घेऊन स्वच्छतेला सुरूवात केली आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणाचे दर्शन संबंध नागरिकांना झाले आहे. यामुळे आतातरी झोपेचे सोंग घेतलेल्या ग्रामपंचायतीने आपले डोळे उघडावे व ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करावे अशी जोरदार चर्चा गावात सुरू आहेत.

Protected Content