चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी घटनादुरुस्तीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र या मागणीला आता यश आले आहे. या घटनादुरुस्तीला जळगाव धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने मंजूरी दिल्याची माहिती विद्यमान सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी “लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज’ला दिली आहे.
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचा कार्यभार १९९२ साली मंजूर असलेल्या घटनेनुसार अद्यापही चालत आहे. परंतु संस्थेच्या हितासाठी या घटनेत बदल करणे आवश्यक असल्याने २०१७ मध्ये जनरल सभेत घटनादुरुस्ती हि बहूमताने मंजूर केली. आणी पुढील मंजुरीसाठी मा.धर्मादाय आयुक्त, जळगाव यांचेकडे पाठविण्यात आली. तेव्हापासून हि बाब न्यायप्रविष्ठ आहे. तत्पूर्वी गेल्या सहा महिन्यात संस्थेचे २००९ चा फेरफार अर्ज मंजुरीसाठी व घटनादुरुस्ती या दोन्ही प्रलंबित न्यायप्रविष्ठ प्रकरणांचा कायदेशीररित्या परिपूर्ण पाठपुरावा करुन कायदेतज्ञाच्या मदतीने सचिव डॉ.विनोद कोतकर यांनी संस्थेची बाजू यशस्वीपणे मांडली. या दोन्ही प्रकरणात संस्थेच्या वतीने वसंतराव चंद्रात्रे, अॕड पंकज देशमुख , प्रा.मिलींद बिल्दिकर ,सुधीर चव्हाण यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. जवळपास १२ हरकतदारांनी घटनादुरुस्ती होवू नये यासाठी लेखी हरकती घेतल्या होत्या. परंतु संस्थेच्या वतीने सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी आवश्यक असे सर्व कायदेशीर दस्तावेज न्यायालयात सादर केल्यामुळे या सर्व हरकतदारांच्या हरकती न्यायालयाने फेटाळून लावत घटनादुरुस्तीला हिरवा कंदिल दाखविला आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणूक पार पडली. यावेळी देखील घटनादुरुस्तीचा मुद्दाच अधिक गाजला. परंतु अखेर घटनादुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे संस्थेचा नक्कीच काया पालटणार आहे.
तत्पूर्वी घटनादुरुस्तीसाठी संस्थेचे सभासद सुधीर चव्हाण यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार ६ महिन्यात हा निकाल लावणे बंधनकारक होते. या घटनादुरुस्तीमुळे सर्व सभासदांना मतदानासोबतच संचालकमंडळाच्या १५ जागांवर उमेदवारी करण्याचा समान अधिकार मिळणार आहे. हा लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे सांगितले जात असून संस्थेच्या सर्व ८ हजार ५०० सभासदांना मी समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे सचिव डॉ विनोद कोतकर यांनी व्यक्त केली आहे. घटनादुरुस्तीसाठी संस्थेच्या वतीने सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले असून जळगाव येथील अॕड. दिपक पाटील यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात काम पाहिले असल्याची माहिती देखील सचिव डॉ.विनोद कोतकर यांनी दिली.