‘अक्षय ऊर्जा’तील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणला पुरस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि असोसिएशन ऑफ रिन्यूएबल एनर्जी एजन्सी ऑफ स्टेट्स यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणचा दोन पुरस्कारांनी गौरव केला आहे.

एआरईएएसच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त केरळमधील कोचीन येथे एएनईआरटी आणि एआरईएएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च रूफ टॉप सौर ऊर्जा स्थापित क्षमता प्राप्त करणे आणि २०२१-२०२२ मध्ये सर्वाधिक रूफ टॉप सौर ऊर्जा क्षमता जोडण्यासाठी महावितरणला दोन पुरस्कार मिळाले असून केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा आणि रसायने व खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे आणि संचालक (वाणिज्य) डॉ.मुरहरी केळे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. याशिवाय महाराष्ट्राची नोडल एजन्सी असलेल्या महाऊर्जाला ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च बायोमास पॉवर स्थापित क्षमता आणि प्लांट्सची स्थापित संख्या प्राप्त करण्यासाठी दोन पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे यांनी स्वीकारला.

 

या कार्यक्रमाला केरळचे ऊर्जामंत्री के. कृष्णनकुट्टी, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आय.एस. चतुर्वेदी तसेच केरळच्या ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि एएनईआरटी आणि एआरईएएसचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

 

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी रूफ टॉप सोलर बसविण्यामध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक यावा यासाठी रूफ टॉप घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. रूफ टॉप वापराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. प्रधान सचिव (ऊर्जा) व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्काराबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content