अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची वेळ : नितीन गडकरी

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । एनएचएआय भवन पूर्ण होण्यासाठी तब्बल ९ वर्षांचा कालावधी लागल्यामुळे केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (न्हाई) संथ कारभारावर नाराजी व्यक्त केली. बुधवारी गडकरी यांच्या हस्ते द्वारकातील एनएचएआय भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

एनएचएआय अपात्र अधिकाऱ्यांनी जागा बनली आहे. त्यांच्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. तसंच अनेक प्रकरणं त्यांच्याद्वारे समितीकडे पाठवण्यात येत आहे. त्यांचं निलंबन किंवा त्यांची सेवा थांबवण्याची आता वेळ आली आहे. येत्या काळात एनएचएआयच्या कामात सुधारणा केली जाईल, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं. अनेक अधिकारी निर्णय घेण्यात विलंब करतात. तसंच काही प्रकरणं गुंतागुंतीची केली जातात. चीफ जनरल मॅनेजर आणि जनरल मॅनेजर अनेक वर्षांपासून बसले आहेत, असंही ते यावेळी म्हणाले. प्रकल्पांमध्ये होणाऱ्या विलंबासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांचे फोटो एनएचएआय भवनात लावण्यात यावेत, अशी टीकाही गडकरी यांनी एनएचएआयच्या अध्यक्षांना उद्देशून केली.

एनएचएआय भवनासाठी कामाची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली. २०११ मध्ये याची निविदा काढण्यात आली. या भवनाच्या उभारणीला नऊ वर्षांचा कालावधी लागला. या कालावधीदरम्यान एनएचएआयमध्ये सात अध्यक्ष आले आणि दोन सरकारही स्थापन झाली. अखेर एनएचएआयच्या आठव्या अध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये या भवनाचं काम पूर्ण झालं, असं गडकरी यांनी नमूद केलं.

Protected Content