देशातील निम्म्याहून अधिक वाहनांचा विमा नाही

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था,। रस्त्यावर धावणाऱ्या एकूण वाहनांपैकी ५० टक्के वाहनांचा विमा उतरवला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोटार वाहन कायदा २०१९नुसार सर्व प्रकारच्या वाहनांचा विमा असणे बंधनकारक आहे. इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या (आयआयबी) वतीने जारी करण्यात आलेल्या नव्या अहवालानुसार मार्च २०१९पर्यंत जवळपास ५७ टक्के वाहनांनी कोणताही विमा घेतलेला नाही.

मार्च २०१८मध्ये विमा न घेतलेल्या वाहनांचे प्रमाण ५४ टक्के होते. विना इन्शुरन्स रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण अधिक असल्याचेही दिसून आले आहे. अहवालानुसार अशी दुचाकींचे प्रमाण ६६ टक्के आहे. देशातील १५ राज्यांमध्ये विनाइन्शुरन्स रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. त्यातील बहुतांश वाहनांचा पहिल्या वर्षानंतर विमा उतरवला नसल्याचे दिसून आले आहे.

जगभरातील अनेक वाहन बाजारपेठांपैकी भारत ही एक प्रमुख आणि मोठी बाजारपेठ असून, दर वर्षी दोन कोटींहून अधिक वाहनांची विक्री होते. याशिवाय वर्षभरात सर्वाधिक अपघातही भारतातच नोंदवले जातात. यातूनच वाहनांचा विमा न उतरवणे किती घातत ठरू शकते, याचा अंदाज येतो. आयआयबीच्या अहवालानुसार ३१ मार्च २०१९पर्यंत एकूण २३.१२ कोटी वाहने रस्त्यांवर धावत होती. त्यापैकी ५७ टक्के वाहनांचा विमा उतरवलेला नव्हता. २०१७-२८मध्ये हे प्रमाण ५४ टक्के होते. त्या वेळी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची एकूण संख्या २१.१२ कोटी होती.

आयआयबीच्या अहवालात नमूद केल्यानुसार विमा न उतरवलेल्या वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील एकूण वाहनांच्या संख्येपैकी ७५ टक्के दुचाकी वाहने असून, त्यातील ६० टक्के वाहनांचा विमा उतरवलेला नाही. सर्वाधिक विमा कारचा उतरविण्यात येत असल्याचेही दिसून आले आहे. केवळ १० टक्केच कार विना इन्शुरन्स रस्त्यावर धावतात. जवळपास ५२ टक्के वाहनांमध्ये पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर विमा उतरवला जात नसल्याचेही निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. त्यातही दुचाकी वाहनांचे प्रमाण मोठे आहे.

मोटार वाहन कायदा २०१९अंतर्गत सर्व प्रकारच्या वाहनांचा थर्ड पार्टी विमा घेणे अनिवार्य आहे. थर्ड पार्टी विम्याअंतर्गत रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास वा अन्य कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. संबंधित वाहनाचा विमा नसणे, याचा अर्थ असा की रस्ते अपघातात जखमी झालेल्या अथवा मरण पावलेल्याच्या वारसदारास कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही.

सर्वसाधारण विमा उद्योगात वाहन विम्याचे प्रमाण ४० टक्क्यांच्या आसपास आहे. आर्थिक वर्ष २०१८-२९मध्ये सर्वसाधारण विमा उद्योगातील कंपन्यांनी ६४ हजार ५२२.३५ कोटी रुपयांचा प्रीमियम गोळा केला होता. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि दिल्ली या राज्यांतील पन्नास टक्क्यांहून अधिक वाहनांचा विमा उतरवण्यात आला आहे.

Protected Content