वारीला बदनाम करण्याचा फडणवीस व भाजपचा प्रयत्न : नाना पटोले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वारकर्‍यांवरील लाठीहल्ल्याचे प्रकरण सरकार दाबत असून वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

 

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

 

आज टिळक भवन येथे माध्यमांशी बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वारकर्‍यांवर करण्यात आलेल्या लाठी हल्ल्यावरून सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, शेकडो वर्षांपासून चालत आलेली वारकरी परंपरा दरवर्षी शांततेत पार पडते. वारकर्‍यांच्या नियोजनाची आणि शिस्तीची जगभरात दखल जाते. पण काल आळंदीत पोलीसांच्या मुजोरपणामुळे वारीला गालबोट लागले. काही कारण नसताना पोलिसांनी वारकर्‍यांवर लाठीमार केला हे स्पष्ट दिसत आहे. मग लाठीमार झालाच नाही असा खोटा दावा करुन गृहमंत्री फडणवीस काय सिद्ध करु पहात आहेत? असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

 

पटोले पुढे म्हणाले की, आळंदीत झालेला प्रकार महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेला काळीमा फासणारा आहे. भारतीय जनता पक्षाला खोटे बोल, पण रेटून बोलची विकृती जडलेली आहे. त्याच मुशीत तयार झालेल्या फडणवीसांना आळंदीतला पोलीस अत्याचार दिसत नाही हे कोडगेपणाचे लक्षण आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी फडणवीस आता वारकर्‍यांना दोष देऊन वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भाजपाचा आयटी सेल वारकर्‍यांनाही खोटे ठरवू लागला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. शिंदे फडणवीस सरकारने आळंदीत वारकर्‍यांवर झालेल्या लाठीचार्जची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.

 

दरम्यान, अब्दुल सत्तार हे सातत्याने बेजबादार विधाने करून शेतक-यांचा आणि कष्टक-यांचा अवमान केला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांना खते व बियाणे वेळेवर मिळाली पाहिजे याची व्यवस्था करण्याऐवजी कृषीमंत्री आणि त्यांचे कार्यालय धाडी घालून वसुली करण्यात गुंग आहे हे अतीशय गंभीर आहे. या वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Protected Content