पुणे प्रतिनिधी । साखर आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले ऊस उत्पादकांचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना एकरकमी एफआरपी मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौक ते साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. दुपारी साखर संकुलात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची दोन वेळा साखर आयुक्तासोबत चर्चा देखील झाली. या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने राजू शेट्टी यांनी जागेवरून कोणत्याही परिस्थितीमध्ये हटणार नाही अशी भूमिका घेतली होती. यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र रात्री उशीरा साखर आयुक्तांनी भेट घेत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. साखर आयुक्तांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेत एफआरपी थकवणार्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिले. दरम्यान, खासदार शेट्टींनी आश्वासन पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.