राजस्थानात मुली सुरक्षित नाहीत-राष्ट्रीय महिला आयोग

स्थानिक प्रशासनाविरोधात पक्षपाताची तक्रार

जयपूर: वृत्तसंस्था । राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक राजस्थान दौऱ्यावर आहे. महिला आयोगाच्या सदस्या श्यामला कुंदर आणि राजुलबेल देसाई या जयपुरात पोहोचल्या आहेत. या वेळी राज्यात मुली सुरक्षित नाहीत, असे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या राजस्थान दौऱ्यावर देखील आता राजकारण सुरू झाले आहे. आम्हाला पत्रकार परिषद आयोजित करायची होती, मात्र जिल्ह्यात करोनामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे, असे आम्हाला जिल्हा प्रशानाने सांगितले. राजस्थान सरकारचे मंत्री धरणे आंदोलन करत आहेत हे सत्य आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या राजुलबेन देसाई यांनी म्हटले आहे.

महिला आयोगाच्या या पथकाने महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ. के. के. पाठक यांच्याकडून माहिती घेतली आणि गुन्ह्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. आयोगाच्या या सदस्यांनी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. राज्यात महिलांवरील अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने काय पावले उचलली यावर देखील या पथकाने चर्चा केली.

महिला आयोगाच्या या पथकाने पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये कठोर कारवाई न करण्याबाबत चिंता व्यक्त केली. पोलिस अधिकारी महिला आयोगाला अहवाल पाठवण्यात वेळकाढूपणा करतात, असे महिला आयोगाने म्हटले आहे.

राजस्थानच्या बारां या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. शेजारी दोन मुलांनी त्यांना पळवून नेले आणि जयपूमध्ये बस स्टँड रोडवर मध्यरात्री बलात्कार केला. मात्र, पीडित मुलींनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. आता पुन्हा मुलींच्या वडिलांनी आरोप केला आहे की मुलींवर दबाव टाकण्यात आला. मुलींच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी देण्यात आल्याने मुलींनी जबाब बदलल्याचे मुलींच्या वडिलांनी सांगितले.

या घटनेवर राजस्थानात राजकीय लढाई सुरू झाली. राजस्थानात घटनात्मक मूल्यांचे हनन होत असून महिलांना न्याय मिळत नसल्याचे जयपूरला गेलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने म्हटले आहे. दलितांवरील अत्याचारांबाबतही राजस्थान देशात अव्वल आहे , असे महिला आयोगाने म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.