पुणे, वृत्तसंस्था । राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत,” असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थची भूमिका ही राष्ट्रवादीची भूमिका नाही असे असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.
पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुलगा पार्थ यांनी केलेल्या ट्विटबद्दल विचारले असता ते म्हणाले, जो तो स्वतंत्र विचाराचा असतो, प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो. पार्थची भूमिका ही राष्ट्रवादीची भूमिका नाही हे आम्ही स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. महात्मा गांधी यांचे विचार आजच्या शतकातही प्रगतीचा मार्ग दाखविणारे आहेत, असे पवार म्हणाले. हाथरसमध्ये माणुसकीला काळीमा फासण्य़ात आला. जो प्रकार घडला त्याला शब्द नाहीत. अशा घटना महिलांच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत आहेत. काही काळ चर्चा होते आणि जो तो आपापल्या कामाला लागतो. निर्भया घडले, त्यानंतरही अनेक घटना घडल्या. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे, असे मत अजित पवार यांनी मांडले.