पाचोरा बाजार समितीत किशोरआप्पा पाटीलच ‘किंग’ !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड बिनविरोध झाली असून या माध्यमातून आमदार किशोरआप्पा पाटील हे सहकारात देखील ‘किंग’ ठरल्याचे दिसून आले आहे.

 

पाचोर्‍यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १८ जागांसाठी झाली होती. यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलने कपबशी चिन्ह घेऊन निवडणुक लढविली होती. त्यांना महाविकास आघाडी आणि अमोल शिंदे यांच्या पॅनलने आव्हान दिले होते.

 

निवडणुकीच्या काळात खूप आरोप प्रत्यारोप झाले होते. यात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीच्या पॅनलला सात तर दोन जागा अमोल शिंदे यांना मिळाल्या होत्या. अर्थात, येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. यात सत्तेच्या जागा अमोल शिंदे यांच्याकडे असल्याचे मानले जात होते.

 

दरम्यान, आज येथील सभापती आणि उपसभापतीची निवड प्रक्रिया पार पडली. यात सभापतीपदी गणेश भीमराव पाटील तर उपसभापतीपदी पी. ए. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे सभापती आणि उपसभापती निवडीत कोणताही चमत्कार न घडता आमदार किशोर पाटील यांनी सहकारात देखील आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Protected Content