जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राज्यासह जिल्ह्यात रोजच टप्प्याप्प्प्याने वाढत असलेल्या तापमानामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे. पुढील चार ते पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर भारतातून एकामागून एक उष्णतेच्या लाटा निर्माण होत असल्याने उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. तर राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील रोजच टप्प्याप्प्प्याने तापमानात वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती तीव्र झाली आहे. त्यामुळे आगामी दोन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
राज्यासह जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढला आहे. बंगालच्या उपसागरामधून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी असून राज्यात निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमाल तापमान सरासरीच्या पुढे जाऊन उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. कमी-अधिक प्रमाणात उष्णतेची लाट पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून, तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
गेल्या आठवड्यात रविवार २४ एप्रिल रोजी चाळीसगाव ४१ अंश वगळता जिल्ह्यात सर्वच शहरातील तापमान ४५ ते ४६ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले होते.
तर आज शुक्रवारी दिवसभरात भुसावळ, जळगाव, ४६.४, अमळनेर ४६, बोदवड ४३, भडगाव ४५, चोपडा, धरणगाव, फैजपूर, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव, यावल ४६, पारोळा ४५, पाचोरा ४४ आणि चाळीसगाव ४१ अंश असे तापमान नोंदवले गेले आहे. आगामी काळात देखील जळगाव जिल्ह्यात तापमान ४३ ते ४६ अंश दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचे वेलनेस वेदर फौन्डेशनचे हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी म्हटले आहे.