डाक विभागाने अवघ्या दोन तासात गुंडाळला कॅम्प; ग्रामस्थांमध्ये नाराजी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डाक विभागाच्या वतीने अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे सुरू असलेला कॅम्प अवघ्या दोन तासात गुंडाळल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील ग्राम पंचायत संकुलात अमळनेरच्या मुख्य डाक शाखेमार्फत एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने पोस्टचा ३९९ रुपयांत वीमा उतरवणे, नवीन आधार कार्ड काढणे तसेच दुरुस्ती करणे आणि आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे या कामी हा कॅम्प लावण्यात आला होता. सदर कॅम्प मध्ये पन्नास च्या वर ग्राहकांनी विमा उतरवून घेतला तर २५ ते ३०आधार कार्ड अपडेट तसेच लिंक करण्यात आली. ही कामे अवघ्या दोन तासात उरकुन कर्मचारी यांनी सर्व्हर डाऊनच्या नावाने आटोपते घेतली. परिणामी आधार कार्ड अपडेट करणाऱ्या अनेकांना माघारी जावे लागले. संबंधित डाक शाखेचे कर्मचारी यांना विनंती करून देखील त्यांनी उपस्थितांचे ऐकून घेतले नाही. आणि सरळ अमळनेर ऑफिसमध्ये या असा सल्ला देऊन मोकळे झाले.

अमळनेर डाक विभागाचे मुख्य अधिकारी यांच्या आदेशाला देखील कर्मचारी यांनी केराची टोपली दाखवत उपकरणे गुंडाळली. व माघारी जाणे पसंत केले. एकीकडे गावात कॅम्प लागणार असल्याचे सूचना द्यायच्या आणि आपल्या सोयीनुसार कामे करायची? सदर कॅम्प घेण्यामागचा नेमका उद्देश काय? असाही प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान एकीकडे शासन विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासन आपल्या दारी असे उपक्रम राबवित आहे. तर दुसरीकडे कर्मचारी यांच्याकडून सर्रासपणे कामचुकार पणा समोर येत आहे.तेंव्हा अशा कर्मचाऱ्यांवर अधिकारी वर्गाने वचक ठेवून समज देणे गरजेचे आहे असा सूर जनमाणसातून व्यक्त केला जात आहे.

 

Protected Content