जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘चला, सुतकताई शिकू या !’ उपक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ज्ञान विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शाळांपासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये भारतीय ज्ञानाविषयीची माहिती अंतर्भूत केली जाणार असून याच अनुषंगाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद कि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’, मेजर-मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट आदीची सुरुवात झाल्याने नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु असून याच अनुशंगाने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘चला, सूतकताई शिकू या !’ या चरख्यावर सुतकताई उपक्रमाचे आयोजन करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्यात चरख्याची भूमिका अनन्यसाधारण होती. महात्मा गांधी सुतकताईला यज्ञ म्हणत असत. सूतकताई हे सत्य, अहिंसा, क्रांती व प्रगतीचे प्रतीक असल्याचे ते म्हणत. आधुनिक काळातही चरख्याचे महत्व विविध शास्त्रीय आधारावर सिद्ध झाले आहे. चरखा चालविल्याने मेंदूची बौद्धिक क्षमता, तार्किक क्षमता, एकाग्रता, बहू-कार्यक्षमता, मन-शरीर समन्वय, आत्मजागरुकता वाढीस लागते. तसेच तणावरहीत जीवनशैलीसह मनःशांती लाभून जीवन आनंदी होते. त्यामुळे महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना याचा अनुभव द्यावा या उद्देशाने गांधी तीर्थ व रायसोनी महाविद्यालयाने हा सयुंक्त उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले कि, गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये अनेक पेटी चरखे आहेत. रोज दोन वेळा सूतकताईचे प्रशिक्षण वर्ग इथे चालतात. प्रत्येक सत्र अर्ध्या तासाचे असते. हे प्रशिक्षण वर्ग निःशुल्क आहेत आणि विद्यार्थी कितीही काळासाठी ही प्रक्रिया शिकू शकतात असे आवाहन करत त्यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना सुतकताईचे विविध फायदे सांगितले. या उपक्रमात विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक सुरेश पाटील, सीमा तडवी, बाळू बारी, विश्वजित पाटील यासह आदींनी घेतली तर या कार्यक्रमाचे संपूर्ण समन्वय जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांनी सांधले.

Protected Content