जळगावात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील शिवसेना – भाजपा युती सरकारने विविध विभागांच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळण्यासाठी “शासन आपल्या दारी” ही योजना राबविण्यास विविध ठिकाणी सुरुवात केली असतांना जळगाव येथे २७ जुन रोजी मंगळवारी पोलिस कवायत मैदानावर जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार नागरीकांना या योजनेचा लाभ देण्याचे ठरविले आहे.

दुपारी चार वाजता होणाऱ्या या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री ना. अबुल सत्तार, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीष महाजन, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार लताबाई सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सह जिल्हा भरातील उपविभागीय अधिकारी, तहशिलदार, गटविकास अधिकारी, व विविध विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला आहे.

“शासन आपल्या दारी” योजनेत पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपरिषदेच्या विविध योजना, आरोग्य विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विजविरण कंपनी, संजय गांधी निराधार योजना, पशुसंवर्धन विभाग, सहकार विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. “शासन आपल्या दारी” ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंगळवारी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके, तहसिलदार मुकेश हिवाळे, यांच्या उपस्थितीत तिसरी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी विविध भागाच्या प्रमुखांना योजना राबविताना सर्व विभागाने काळजी पूर्वक काम करण्याची सुचना देवून विभाग प्रमुखांनी आपले लाभार्थी निवडून त्यांना जळगाव येथे घेवून जाणे व कार्यक्रमानंतर घरी सोडण्याची जबाबदारी स्विकारावी. काही विभागातील कार्यालय प्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी गैरहजर असल्याने प्रांताधिकारी भुषण अहिरे यांनी नाराजी व्यक्त करत गैरहजर असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याच्या सुचना केल्या आहेत. याशिवाय शुक्रवारी दुपारी चार वाजता पुन्हा शेवटची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी विभाग प्रमुख येणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करून त्याचा आढावा सादर करण्याच्या सूचना दिल्या.

पाचोरा – भडगाव तालुक्यातून २ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ
शासना आपल्या दारी योजनेत विविध शासकीय योजनांचा पाचोरा तालुक्यातील एक हजार व भडगाव तालुक्यातील एक हजार अशा दोन हजार तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ७५ हजार नागरीकांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

यांची होती उपस्थिती
पाचोरा येथे झालेल्या आढावा बैठकीत निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, सांगायचे नायब तहसिलदार बी. डी. पाटील, प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार सुभाष कुंभार, रमेश मोरे, पालिकेचे उपमुख्याधिकारी दगडू मराठे, विजविरण कंपनीचे आर. व्ही. सिरसाठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील, शिक्षणाधिकारी शिरीष जगताप, मुकेश भुमरे, रविंद्र लांडे, अभिजित येवले, डॉ. सुजाता सावंत, शोभा मगर, एस. बी. आय. च्या सोनाली पवार, सहकार विभागाचे महेश कासार, अमोल भोई, पोस्ट मास्तर राजेंद्र वाणी, सब रजिस्टार एस. एस. बारस्कर उपस्थित होते.

Protected Content