जळगाव प्रतिनिधी। चाळीसगावातील के.के.मूस बंगल्याशेजारील शेडमधून सेंट्रींग साहित्याची चोरी झाल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्याततील तीन आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एलसीबीने अटक करून त्यांच्या ताब्यातून चार लाख आठ हजारांचे सेंट्रींगचे साहित्य व ट्रक जप्त केला आहे. आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, जळगावच्या शिवारात नगरात आरोपींसह मुद्देमाल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दीपक छगन कोळी (25, रा.कानसवाडा, जि.जळगाव), शेखर वासुदेव कोळी (21, रा.कानसवाडा, जि.जळगाव) व गाडी चालक मजीद खान बिसमील्ला खान (45, रा.शिवाजी नगर, जळगाव) यास अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चार लाख आठ हजार रुपये किंमतीचा सेंट्रींग सामान तसेच टाटा 407 वाहन जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात हवालदार अनिल जाधव, रवींद्र पाटील, सुधाकर अंभोरे, विलास पाटील, दादाभाऊ पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, अशोक महाजन यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.