अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रंजाणे गावाजवळ कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २० मार्च रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारवड पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय बाबुलाल पाटील (वय-४२) रा. हिंगोणे ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील भिकन रसुल पिंजारी रा. अमळनेर यांच्यासोबत २० मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ एएस ५०८५) ने अमळनेर येथून हिंगोणे गावात येत असतांना समोरून कारला ओव्हरटेक करत येत असलेली दुचाकी (एमएच १९ ए ४६८९) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील विजय पाटील आणि भिकन पिंजारी हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीधारक जयेश बाळू पाटील रा. अंतुर्ली ता. अमळनेर याच्या विरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.