तरूणाचा निर्घृण खून करणाऱ्यांची नावे निष्पन्न; मुख्य सुत्रधाराला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवाशी असलेल्या तरूणाचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील उत्राण-भातखंडे परिसरात रविवारी उघडकीला आली होती. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार याला पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कासोदा पोलीसांची संयुक्तरित्या केली आहे.

सचिन उर्फ देविदास पाटील (वय – ३९) रा. अंतुर्ली ता.पाचोरा या तरूणाचा निर्घृण खून करण्यात आला होता.

वाळू व्यवसायाच्या जुन्या वादातून सचिन पाटील याने एक महिन्यापुर्वी गिरड येथील निलेश देसले याला मारहाण करून जखमी केले होते. या बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.  पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली सचिन उर्फ देविदास पाटील हा रविवारी १९ मार्च रोजी बुलेट गाडीवरुन गिरणा नदीपात्रातील भातखंडे ते उत्राणकडे जाण्यासाठी निघाला होता. दर्ग्याजवळ आल्यानंतर मोटारसायकलवर बसून पुर्वेकडे तोंड करून उभा असलेला सचिन पाटील यांच्या मागवून भरधाव वेगाने आलेल्या बुलेरो गाडीने बुलेटसह त्यास जोरदार ठोस देवून १५ ते २० फुट फरफटत नेले. त्यात सचिन हा बुलेटहून खाली कोसळल्यानंतर बुलेरो वाहनातून उतरुन हल्लेखोरांनाी त्यांच्या छातीवर, मानेवर व बरगड्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन सचिन ह्यास जमिनीवर कोसळल्यानंतर बुलेरो घेऊन पसार झाले होते. या घटनेबाबत कासोदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निलेश ज्ञानेश्वर देसले रा. गिरड ता. भडगाव, शुभम ज्ञानेश्वर पाटील रा. गिरड ता. भडगाव, समाधान सुधाकर पाटील रा. वेरूळ खुर्द ता.पाचोरा आणि एक अनोळखी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली. यात टोळीने हल्ला करून बोलेरोवाहन कानळदा रोडवर सोडून पसार झाले होते. वाहनाच्या चेसीस क्रमांकावरून हल्लेखोरांची वरील नावे निष्पन्न झाली होती. या गुन्ह्यात मुख्य सुत्रधाार निलेश देसले याला अटक केली आहे. त्याला गंभीर दुखापत केल्यामुळे त्याची पोलीस संरक्षणात उपचार सुरू आहेत. इतर फरार झालेल्या संशयिताच्या शोधासाठी पथक मुंबईला रवाना झाले आहे.

Protected Content