एरंडोल येथे महावितरणची १७ विजचोरांवर कार्यवाही

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील महावितरण विभागातर्फे मोठी कार्यवाही करण्यात आली.यात तब्बल १७ वीजचोरांवर कार्यवाही करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिवसेंदिवस एरंडोल शहर कक्षातील फिडरचा भार हा वाढू लागल्याने नुकताच महावितरण एरंडोल उपविभागातर्फे एरंडोल शहर कक्षांतर्गत लक्ष्मी नगर ,आदर्श नगर , ओम नगर व अशोक नगर येथील घरगुती १५७ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७ वीज  ग्राहकांनी त्यांच्या मीटर मध्ये फेरफार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने त्यांचे मिटर  महावितरण तर्फे पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत.

 

चाचणी विभाग धरणगाव येथे सदर मीटरच्या तपासणीनंतर मीटरमध्ये आढळलेल्या त्रुटीप्रमाणे वीज चोरीच्या बिलांची आकारणी करण्यात असल्याचे व वीज चोरीचे बिल न भरल्यास सदर ग्राहकांवर त्वरीत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 

सदर वीज चोरी दरम्यान मीटर मध्ये फेरफार केलेल्या बहुतांश ग्राहकांकडे ए.सी.चा वापर असल्याचे आढळून आले आहे.सदर तपासणी करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ही मोहीम एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली.

 

या मोहिम मध्ये प्रशांत महाजन,सहाय्यक अभियंता एरंडोल शहर कक्ष; लक्ष्मी माने सहाय्यक अभियंता एरंडोल ग्रामीण कक्ष; जयदीपसिंग पाटील सहाय्यक अभियंता गुणवत्ता नियंत्रक एरंडोल उपविभाग; मनोहर पाटील सहायक लेखापाल व इतर सर्व जनमित्र यांनी सहभाग नोंदवला.सदर मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यकारी अभियंता धरणगाव रमेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content