जळगाव प्रतिनिधी । स्वच्छ भारत योजनेत परस्पर निधी काढणार्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आज जिल्हा परिषदेचे सीईओ पाटील यांनी स्थायी समितीच्या सभेत दिले.
जिल्हा परिषद सभागृहात आज दुपारी दोन वाजता स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील भामरे या गावात स्वच्छ भारत अंतर्गत देण्यात येणारे शौचालय व स्वच्छता अनुदान संबंधितांना न मिळता परस्पर काढण्यात आले त्याची संपूर्ण चौकशी करण्याचे सांगण्यात आले. याबाबत सीईओ पाटील यांनी याबाबत फौजदारी गुन्हे दाखल करा असे सांगितले. याच बरोबर ठेकेदाराने काम घेताना बोगस कागदपत्रे सादर केल्यास तोच जबाबदार राहील असा ठराव पास झाला. दरम्यान, आरोग्य खात्याबाबत मेडिकल बिले अडकलेली आहे ती त्वरित काढावी, तसेच बोगस डॉक्टरांच्या रॅकेटवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. पाणी पुरवठयाची जी कामे अर्पूण राहिले आहे ती कामे त्वरित करावी असे निर्देशदेखील याप्रसंगी देण्यात आले.