जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची दि.३ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, व शिवसेना यांची महाविकास आघाडी झाली असून काँग्रेसकडून आज (दि.१) पक्षाच्या चारही सदस्यांना जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी पक्षाच्या वतीने पक्षादेश (व्हीप) बजावला आहे. या सदस्यांत प्रभाकर नारायण सोनवणे, अरुणा आर.पाटील, दिलीप युवराज पाटील, सुरेखा नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचे चार सदस्य निवडुन आलेले आहेत. यानुसार प्रांताध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून हा व्हीप बजावण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, दिनांक ३ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या बैठकीमध्ये आपण उपस्थित राहुन अध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्री अनिल पाटील यांना मतदान करावे. या व्हीपचे उल्लंघन केल्यास आपण महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ व नियम १९८७ चे तरतुदीनुसार अनर्हतेचे कारवाईस पात्र राहाल. वरील आदेशाचे काटेकोर पालन करावे, अन्यथा या पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी दिली आहे.