जळगाव, प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील कन्हाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिरमध्ये पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भात व वरण दिला असता ९ विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास झला होता. याबाबत जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निकृष्ट पोषण आहाराबाबत तक्रार केली.
कन्हाळे बृ. येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर मध्ये दि. २२ रोजी विद्यार्थ्यांनी शाळेतील वरण भात खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या. मात्र, मुख्याध्यापिका यांनी परस्पर मुलांना दवाखान्यात नेले. संध्याकाळी जेव्हा मुले घरी आली तेव्हा त्यांच्या पालकांना हा सर्व प्रकार समजला. यानंतर त्यांनी जि. प. सदस्या पल्लवी सावकारे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. आज सकाळी सौ. सावकारे यांनी शाळेला भेट दिली असता तेथील पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे त्यांना आढळून आले. या आहारात किडे, आळ्या आहेत. यापोषण आहाराचा नमुना तसेच निवेदन त्यांनी श्री. म्हसकर यांच्याकडे दिले आहे. श्री. म्हसकर यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी त्यांना दिले.
