युगप्रवर्तक महामानवास महावंदना…!

MOC BIO TUSHAR BABASAHEB AMBEDKAR Featured

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून. भारतीय राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, मानववंशशास्त्र अभ्यासक, द्रष्टे विचारवंत, थोर समाज सुधारक, पुरोगामी कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक, शिक्षणतज्ञ, संपादक, कठोर तत्वप्रिय नेते असे बाबासाहेबांचे प्रखर व्यक्तिमत्व होते. बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे रामजी आंबेडकर म्हणून ओळखले जात. ते सैन्यात मेजर-सुबेदार म्हणून सेवा करीत. त्यामुळे त्यांच्या भारतात विविध ठिकाणी बदल्या होत. सेवेबरोबरच ते समाजकार्यही करीत. त्यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. कोकण विभागाचा माहिती उपसंचालक असताना संपादक मित्र राजेंद्र घरत, सामाजिक कार्यकर्ते व वकील मित्र अॅड. योगेश मोरे यांच्या समवेत आंबावडे येथील स्मारक पाहण्याची संधी मिळाली होती.

मध्यप्रदेशातील महू येथे बाबासाहेबांच्या वडिलांची नेमणूक असताना १४ एप्रिल १८९२ रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला होता. आता या महूचे नामकरण “डॉ. आंबेडकर नगर” असे करण्यात आले आहे. सातारा येथील शासकीय विद्यालयात त्यांनी १९०० साली नोव्हेंबरमध्ये प्रवेश घेतला. १९०८ सालच्या जानेवारी महिन्यात ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पर्शियन आणि इंग्रजी घेऊन १९१३ मध्ये ते बी.ए. झाले.सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन १९१३ च्या जुलै महिन्यात ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी दाखल झाले. अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन ते १९१५ मध्ये एम.ए. झाले. याशिवाय डि. लीट, डीएससी, बॅरिस्टर ऍट लॉ असे ते उच्च विद्याविभूषित होते. ”दि कास्ट इन इंडिया” हा त्यांचा पहिला शोधनिबंध १९१६ मध्ये प्रकाशित झाला.
इंग्लंडमधील लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पोलिटिकल सायन्स या संस्थेत ते जून १९१६ मध्ये दाखल झाले. आता ही संस्था लंडन स्कुल ऑफ इकॉनामिक्स या नावाने जगभर प्रख्यात आहे. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात १९१७ साली पीएचडीपर संशोधन पूर्ण केले.” स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडिज ” हा त्यांचा ग्रंथ १९१७ मध्ये प्रकाशित झाला.

मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते १९१८ च्या नोव्हेंबर महिन्यात रुजू झाले.
त्यांनी १९२० च्या जानेवारीत ”मूकनायक” वृत्तपत्र सुरु केले. पुढे लंडन विद्यापीठाची अर्थशास्त्रातील एमएससी पदवी मिळवली.
”दि प्रॉब्लेम ऑफ रुपी” या त्यांच्या शोधप्रबंधाला १९२३ च्या मार्चमध्ये अर्थशास्त्रातील डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी मिळाली.
तत्कालीन मुंबई शासनात विधान परिषद सदस्य (एम.एल.सी.) म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
सामाजिक समतेच्या चळवळीतील अत्यन्त महत्वाचे पाऊल ठरलेला महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह १९२६ च्या मार्च महिन्यात बाबासाहेबांनी घडवून आणला. १९२७ च्या एप्रिलमध्ये त्यांनी “बहिष्कृत भारत” वृत्तपत्र सुरु केले. मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयात १९२८ मध्ये ते प्राध्यापक झाले. १९३० साली त्यांनी “जनता” पत्र सुरु केले. मानव मुक्तीच्या शांततामय संघर्षात गाजलेला ‘काळाराम मंदिर सत्याग्रह’ त्यांनी १९३० ते ३५ या कालावधीत केला.
ब्रिटिश सरकारने १९३०-३२ या दरम्यान आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.
१९३२ च्या सप्टेंबरमध्ये त्यांनीं पुणे करार केला. प्राध्यापक असलेल्या सरकारी विधी महाविद्यालयाचे ते १९३५ मध्ये प्राचार्य झाले.

अथक प्रयत्न करूनही जात व्यवस्था जात नाही हे पाहून त्यांनी १९३५ च्या ऑक्टोबर महिन्यात येवला येथे झालेल्या जाहीर सभेत हिंदु धर्मत्यागाची घोषणा केली. पुढे जवळपास २० वर्षांनी त्यांनी प्रत्यक्ष धर्म परिवर्तन केले.१९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. शिक्षण ही मूठभर माणसांची मक्तेदारी राहू नये, म्हणून त्यांनी १९४५ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे विविध ठिकाणी विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. या संस्थेने शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणूनच आम्ही घडलो, असे ऋण लाखो विद्यार्थी व्यक्त करतात.

”हू वेअर शुद्राज” हा त्यांचा गाजलेला ग्रंथ १९४६ मध्ये प्रकाशित झाला. १९४७ च्या ऑगस्ट महिन्यात ते घटना समितीचे अध्यक्ष झाले.  १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री झाले. बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सादर केले. हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले गेले. तेव्हापासून आपण दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. १९५० च्या जूनमध्ये बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून
कोलंबिया विद्यापीठाने आपल्या या विद्यार्थ्यांस १९५२ मध्यें एलएलडी पदवीने गौरविले.
बाबासाहेबांनी १९५५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. त्याच वर्षी “प्रबुद्ध भारत” वृत्तपत्र सुरु केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लाखो अनुयायांसोबत नागपूर येथे बौद्धधर्म स्विकारला. नेपाळमधील काठमांडू येथे नोव्हेंबर १९५६ मध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
६ डिसेंम्बर १९५६ रोजी दिल्ली येथे या महा मानवाचे महापरिनिर्वाण झाले. विश्व एका महान विश्वनायकास मुकले. भारत सरकारच्या “भारतरत्न” या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना १९९० मध्ये गौरविण्यात आले. बाबासाहेबांवर आतापर्यंत १२ चित्रपट, अनेक माहिती पट, सहा दूरचित्रवाणी मालिका, नाटके निर्माण झाली आहेत. भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्मिती सहायक म्हणून काम करत असताना निर्माते सुधीर पाटणकर यांच्या समवेत मला “ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” हा टीव्हीपट राष्ट्रीय प्रसारणासाठी हिंदीतून आणि मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित करण्यासाठी मराठीतून करण्याची संधी मिळाली होती. त्याकाळी दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी असल्याने ६ डिसेंम्बर १९८९ रोजी प्रसारित झालेल्या या पटास प्रचंड प्रतिसाद लाभला होता. राष्ट्रीय प्रसारणात “प्राईम टाईम” असणाऱ्या रात्री ९.०० वाजता तो प्रसारित करण्यात आला होता, नंतर या अभिमानास्पद आठवणींवर आधारित लेखही मी लिहिला होता. बाबासाहेब आपल्यातुन शरीर रूपाने गेले असले तरी काळ जसा पुढे जात आहे, तसतसे त्यांचे “स्वातंत्र्य, समता, बंधुत्व,” शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ” असे एक ना अनेक तेजस्वी विचार, तत्वे जगाला अधिकाधिक प्रकाशमान करत आहेत. दरवर्षी मुंबईत १४ एप्रिल या त्यांच्या जयंतीदिनी आणि ६ डिसेंबर या महा परिनिर्वाणदिनी तसेच नागपूर येथे धम्म परिवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने उसळणारा जनसागर या लोकोत्तर महापुरुषाची महती गात असतो. त्यांच्या विचारांचे अनुकरणच आपल्याला व या विश्वाला पुढे नेणारे आहे.

या महामानवास मनःपूर्वक मानवंदना..!

लेखक – देवेंद्र भुजबळ, (माध्यमकर्मी)

([email protected])

*****  संदर्भसूची : –

१. रणपिसे अप्पा, दलितांची वृत्तपत्रे, प. १-२.

२. पानतावणे गंगाधर, पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे,१९९६, पृ. ६,२३९,२४०,२४१,२४७,२४८

३. कानडे रा. गो., मराठी नियतकालिकांचा इतिहास, कर्नाटक , मुंबई, १९३४, पृ. ३.

४. हिवराळे सुखराम, लोकपत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९०, पृ.९.

५. आढावे प्रशांत, माध्यम संशोधन पत्रिका .

६. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विलायतेहून आलेली पत्रे . रमेश रघुवंशी पृ. १- २.

७. निबंधकार डॉ. आंबेडकर, डॉ. यशवंत मनोहर, प. १८,१९,२०,२१,२२,२३, १०३,१०४.

८. डॉ. आंबेडकर विचारमंथन, डॉ.वा.ना. कुबेर, पृ. १७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७,२८.

९.गुगल.

Add Comment

Protected Content