बाल युट्युब स्टार अनुजचा आयर्नमॅन कृष्णप्रकाश यांच्याशी संवाद ! (Video)

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी । बाल युट्युब स्टार म्हणून ख्यात असणारा अनुज टिकम शेखावत याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्णप्रकाश यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून यशाच्या विविध टिप्स जाणून घेतल्या.

युट्यूब ब्लॉगर अनुज शेखावत यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ऑनलाइन शिक्षणाबाबत मुलाखत घेतली. भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी असलेल्या कृष्णप्रकाश यांनी नुकतीच आयर्नमन ट्रायथलॉन पूर्ण केली. या मुलाखतीत त्यांनी विद्यार्थी व पालकांनी ऑनलाइन शिक्षणाकडे कसे पाहावे, जीवनमूल्ये आणि अमूल्य तत्त्वे त्याशिवाय त्यांच्या बालपणीच्या आठवणीही जागविल्या.

ऑनलाइन शिक्षणाच्या दीर्घ कालावधीमुळे कंटाळलेल्या मुलांना काय संदेश द्याल, असा प्रश्न अनुजने विचारला असता, ते म्हणाले की, नियमित अभ्यासाव्यतिरिक्त मुलांनी चांगल्या छंदांमध्ये त्यांचा वेळ घालवावा. पालकांनी मुलांच्या डोक्यांवर हेलिकॉप्टरसारख्या घिरट्या घालू नयेत मात्र मुलांना प्रोत्साहित करावे त्याशिवाय त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. अत्युच्च नीतीमूल्ये त्यांना शिकवावीत. खूप नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर लक्ष ठेवावे.

जीवन म्हणजे कसोटी क्रिकेट आहे. जरी तुम्ही पहिल्या इनिंग्जमध्ये धावा करू शकला नाहीत तरी दुस-या इनिंग्जमध्ये तुम्ही द्विशतक करू शकण्याची संधी असते, असेही कृष्णप्रकाश यांनी स्पष्ट केले.
स्वतःच्या बालपणी त्यांचे ध्येय काय होते आणि ते दिवस कसे होते या अनुजच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी पुढे कोण व्हावे याबाबतची कल्पना माझ्या बालपणी नव्हती. कुणीही मला मार्गदर्शन करण्यासाठी नव्हते. तेव्हा गुगलही नव्हते की यूट्यूबही नव्हते. मात्र, सत्याच्या मार्गावर चालण्याचा माझा दृढनिश्चय होता. सत्यवादी असणे हे चांगले असण्यापेक्षा खूप चांगले असते.

बालपणीचे किस्से सांगताना त्यांनी शाळेच्या आठवणी जागविल्या. शाळेच्या प्राचार्यांनी त्यांना चांगल्या वागण्याबद्ल शाबासकी दिली होती. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या काठिण्यपातळीवरही भाष्य केले. आयपीएस अधिकारी बनण्यासाठी त्यांना द्याव्या लागलेल्या मुलाखतीबाबतही त्यांनी सांगितले ते म्हणाले की, तुम्हाला किती गुण देऊ म्हणजे तुम्ही आयपीएस अधिकारी व्हाल असे मला विचारले असता मी म्हणालो की, अधिकारी झालो अथवा नाही हे महत्त्वाचे नाही. मात्र, माझ्या क्षमतेएवढेच गुण द्या. त्यांना माझे उत्तर आवडले. आणि मला १९८ गुण मिळाले आणि मी आयपीएस अधिकारी झालो.

त्या संपूर्ण मुलाखतीत, संवेदनशीलता, सत्य आणि सकारात्मक दृष्टीबाबत बोलल्याचे त्यांनी सांगितले. शाळेत जाणा-या मुलाला एका सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पिकरने सोशल मीडियावर दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. या व्हिडिओला पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अनूज हा विठ्ठलवाडीतील सेंट झेव्हिअर स्कूलचा सातवीतील विद्यार्थी असून प्रसिद्ध साहित्यिक-कवी टिकम शेखावत आणि कथकगुरू दीप्ती शेखावत यांचा तो मुलगा आहे.

खालील व्हिडीओत पहा अनुजने कृष्णप्रकाश यांची घेतलेली मुलाखत

Protected Content