खरजई येथे तरूणाचा चाकू भोसकून खून

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  चाळीसगाव तालुक्यातील ३२ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश साहेबराव सोनवणे (वय-३२) रा. बेघरवस्ती खरजई ता.चाळीसगाव हा आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावात राहणारा प्रविण उर्फ मोन्या राजू सोनवणे रा. बायपास रोड, चाळीसगाव याने यापूर्वी गावातील पिंटू शिंदे या मुलाला मारहाण केली होती. यासंदर्भात बुधवारी २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता सतीश सोनवणे याने मुलाला का मारहाण केली? असा जाब प्रवीण सोनवणे यांना विचारला. याचा राग आल्याने प्रवीणने सतीशला मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर सतीश सोनवणेची पत्नी जवळ आल्या आणि पतीला शिवीगाळ का करतो असे विचारले असता मयताच्या पत्नीला देखील शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. ही झटापटीत सुरु असताना आरोपी प्रविण उर्फ मोन्या राजू सोनवणे याने सतीश सोनवणे यांच्या पोटात चाकू भोसकून खून केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.

 

Protected Content