तरुणांनी तर्कबुद्धी शाबूत ठेवणारे विवेकी जीवन जगावे ; प्रा. पाठक

IMG 20191005 WA0081

जळगाव,प्रतिनिधी | शिक्षण माणसाला घडवते. यामुळे उत्तम पिढी निर्माण होते. शिकल्याने माणसाला शहाणपण येते असे असले तरीही जीवनात आलेले अनुभव माणसाला शहाणे करतात. म्हणून तरुणांनी चांगले अनुभव जवळ ठेवत तर्कबुद्धी शाबूत ठेवणारे विवेकी जीवन जगावे, असे प्रतिपादन धुळे येथील प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.

लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्ताने तीनदीवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यानिमीत्ताने तिसरे अंतिम पुष्प गुंफताना प्रा.पाठक बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी, उपाध्यक्ष अरुण नारखेडे, सचिव प्रा.एन.एस.पाटील, सहसचिव डी.के.टोके, संचालक किरण बेंडाळे उपस्थित होते.प्रा.पाठक ‘ तरुण मने घडविताना’ या विषयी व्याख्यान देताना म्हणाले की, यशाला शेवटची पायरी नसते. त्यासाठी प्रयत्नशील असावेच लागते. सुनील गावस्कर यांचे उदाहरण देत प्रसंग सांगितला की सुनील गावस्कर यांच्याकडून पहिला चेंडू सुटला तरी ते दुसरा चेंडू हा पहिला म्हणून खेळत असत. म्हणून आपले अपयश दुर्लक्षुन पुढील संधीची वाट पाहावी. आयुष्यात कोणी दिलेले पुस्तके नाकारू नये. पुस्तक नेहमी उपयोगी पडते, असा सल्ला पाठक यांनी दिला. शिकण्याची प्रक्रिया चार भिंतीत पूर्ण होऊ शकत नाही, निरीक्षण म्हणजे खरे शिक्षण होय. त्यातून जिज्ञासा जन्म घ्यायला लागते आणि नविन गोष्टी शिकता येतात. शिक्षण नेहमी विद्यार्थी केंद्रीत असावे. विद्यार्थ्यांच्या अवगुणातील दोष दूर करून त्यांचा विकास करणारे खरे शिक्षक होय,असेही ते म्हणाले. डॉ मनीषा पाटील यांनी सूत्रसंचालन तर आभार संस्थेचे संचालक आर .डी .वायकोळे यांनी मानले. माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील उपस्थित होते. व्याख्यानमालेसाठी लेवा एज्युकेशनल युनियनचे संचालक मंडळ, प्राचार्य एस.एस.राणे, मुख्याध्यापक सी.एस.पाटील आणि मुख्याध्यापक अंजना सुरवाडे, उपप्राचार्य प्रा.रत्नप्रभा महाजन, प्रा.पी.डी.पाटील, प्रा.स्नेहल परशुरामे, डॉ.स्मिता चौधरी, डॉ.ए.एम.नेमाडे, प्रा.बी.एस.साखळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थिनी आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content