भरधाव ट्रकच्या धडकेत तरूण जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आशा कॉम्प्लेक्सजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत तरूण जखमी झाल्याची घटना गुरूवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरात काशीप जफर शेख वय-३० हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवार १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता काशीप जफर हा भुसावळ शहरातील आशा कॉम्प्लेक्स समोरून पायी जात होता. त्यावेळी ट्रक क्रमांक (एमएच १४ बीयू ३५७२) वरील चालक फैयाज खान अमान खान रा. वरदी ता. चिखली जि. बुलढाणा याने ट्रक वेडीवाकडी चालवून पायी जात असलेल्या काशीप जफर शेख याला धडक दिली. या धडकेत कशीप हा थोडक्यात बचावला असून जखमी झाला. दरम्यान, काशीपचे काका शेख गफ्फार अहमद यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता तक्रार दिली. त्यानुसार ट्रकवरील चालक  फैयाज खान अमान खान रा. वरदी ता. चिखली जि. बुलढाणा याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेश चौधरी हे करीत आहे.

Protected Content