भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली येथे पायी जात असलेल्या एका तरुणाला अज्ञात दोन जणांनी पकडून मारहाण करत त्याच्या खिशातील २ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना २५ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली होती. या संदर्भात बुधवारी २ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मनोज रामचरण शर्मा (वय-४०, रा. शिरपूर कन्नड रोड, भुसावळ) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मनोज हा नहाटा चौफुली येथून घरी पायी जात होता. त्यावेळी त्याला अज्ञात दोन जणांनी अडविले. त्याला मारहाण करून त्यांच्या खिशातील १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २ हजार रुपयांची रोकड असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरी हिसकावून चोरून नेला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर मनोज शर्मा यांनी बुधवारी २ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोळी हे करीत आहे.