धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन खरेदीच्या बहाण्याने आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. धरणगाव येथे एका नामांकित आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीची अशाच प्रकारे ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या फ्लिपकार्ट अकाउंटमध्ये सेव्ह असलेल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून तब्बल ७४ हजार २० रुपयांची ऑनलाईन खरेदी करत गंडा घातला आहे.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लक्ष्मण संतोष बाविस्कर (वय ३८, रा. धरणगाव) हे मंत्रालयाशी संबंधित आयटी विभागात नोकरीला आहेत. ते धरणगाव येथे आलेले असताना, १४ मे रोजी दुपारी २ ते रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर ही घटना घडली. एका अज्ञात इसमाने इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून फिर्यादी बाविस्कर यांची ओळख चोरी केली. त्यानंतर त्यांच्या फ्लिपकार्ट अकाउंटमध्ये पूर्वीपासून जतन करून ठेवलेल्या क्रेडिट कार्डच्या माहितीचा अनधिकृत वापर केला. चोरट्याने या कार्डद्वारे एकूण ७४ हजार २० रुपयांच्या वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली आणि त्या वस्तू स्वतःच्या पत्त्यावर स्वीकारून फिर्यादीची फसवणूक केली.

आपल्या खात्यातून परस्पर पैसे वजा झाल्याचे आणि खरेदी झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादी यांनी तात्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. बाविस्कर यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहे.



