कोरपावली येथे योग शिबीर उत्साहात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य कार्यक्रमाबाबत विविध उपक्रमाद्वारे नेहमीच जनजागृती करण्यात येत असून तालुक्यातुन पहिलेच योग शिबिर कोरपावली येथे आयोजित करण्यात आले होते. योग शिबिरातून हिवताप व इतर आरोग्य कार्यक्रमा विषयी जनजागृती करण्यात आली.

हिवतापाविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपाययोजनांच्या अमलबजावणी मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी आरोग्य विभागामार्फत जून महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो. यात विविध उपक्रमाद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या अनुषंगाने २१ जून जागतिक योग दिवस आहे. या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातून पहिले योग शिबिर कोरपावली येथे आयोजित करून हिवताप व आरोग्या बाबत जनजागृती करण्यात आली.

सदर शिबिरात आरोग्य सेवक बालाजी कोरडे यांनी योगामध्ये श्वास नियंत्रण, ओमकार अनुलोम विलोम, व कपालभाती आणि आसनांमध्ये ताडासन, वृक्षासन, व त्रिकोणासन घेतले. यासोबतच हिवताप, डेंग्यू, व चिकनगुनिया ह्या किटकजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयी आरोग्यशिक्षण देऊन जनजागृती केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार व जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांच्या सुचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात हिवताप प्रतिरोध महिना आरोग्य विभागामार्फत साजरा करून मोहीम राबवण्यात  येत आहे. ह्या अनुषंगाने  ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत  ब-हाटे, प्रा. आ. केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी,  डॉ. गौरव भोईटे, व यावल – रावेर ता. हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे  यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपावली येथे योग शिबिर आयोजित करून हिवताप व इतर  आरोग्य कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आली यात प्रामुख्याने महिला आणी तरूणींनी आपला सहभाग नोंदवला.

Protected Content