मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना अटक झाली असतांना मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्याची तयारी झाली होती असा गौप्यस्फोट केला आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आपल्याला विविध खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून मोक्का लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोप गिरीशभाऊ महाजन यांनी केला होता. त्यांनी या आरोपांचा अनेकदा पुनरूच्चार केला आहे. या प्रकरणात तेव्हाचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी काही जणांच्या सांगण्यावरून कट रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर या संदर्भात विधानसभेत चित्रफितींचा समावेश असणारा पेन ड्राईव्ह देखील सादर करण्यात आला होता.
दरम्यान, रविवारी प्रवीण चव्हाण यांना अटक करण्यात आली. तर, यानंतर मुंबईत सत्ताधारी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच प्रकरणाशी संबंधीत गौप्यस्फोट केला. या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. एवढेच नव्हे तर गिरीश महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो, हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी नमूद केले.