यावल प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अपशब्दांचा वापर करणारे भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार सांडूसिंग पाटील यांनी यावलच्या पोलीस निरिक्षकांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा मुस्लीम बांधवानी आयोजित केलेला होता.सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकाग्रहस्तव सदर कार्यक्रमात ‘चढता सुरज धीरे धीरे ढलता ढल जायेगा’ या कव्वालीचे गायन केले.
मात्र या कव्वाली गायनानंतर भाजपचे नेते निलेश नारायण राणे यांनी आपल्या व्टिटर अकांऊटवरून ना. गुलाबराव पाटील यांनी गायलेल्या कव्वालीवरून अतिशय खालच्या स्तरावरून टीका केली. निलेश राणे यांचे वक्तव्य हे अतिशय कुटील हेतूने लिहिलेले आहे. सदर लिखाणातून धर्माबद्दल असलेला त्याच्या कुटील हेतु लक्षात येतो. कव्वाली हा मुस्लिम धर्माची ओळख असून तो महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गायल्याने सदर आरोपीने त्यांच्या कृतीवर आगपाखड करून धर्माबद्दल एकप्रकारे तेढ निर्माण व्हावी. म्हणून त्यांनी सदरचे ट्विट केले आहे. तसेच राणे यांनी त्यांच्या मनात कव्वाली बादल किती देश आहे हे दाखवून एक प्रकारे मुस्लिम धर्माचा अपमान त्याने केलेला आहे, त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून त्याने गुलाबराव पाटलावदल तसेच हिन्दु हृदय सम्राट वंदनीस बाळासाहेब ठाकरे यांचा देखिल उल्लेख केलेला आहे. यांना मानणारा मोठा वर्ग आज देशात असून त्यांच्या भावनेचा अपमान सदर आरोपीने केलेला आहे. यामुळे राणे यांनी आमच्या नेत्यांबद्दलची असलेली जनमानसातली प्रतिमा तसेच त्यांच्या लौकिकास बाधा निर्माण होईल असे हेतु पुरस्करपणे शब्द वापरून माझ्या नेत्याची अब्रुनुकसानी केलेली आहे.
यामुळे निलेश नारायण राणे यांच्या विरोधात भादंवि कलम १२४ के. १५३ क, २९५ क,५००, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आलेली आहे. या तक्रार अर्जावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुषार सांडूसिंग पाटील, रविंद्र सोनवणे, जगदीश कवडीवाले, शरद कोळी, हुसैन तडवी, पप्पु जोशी, संतोष खर्चे, योगेश चौधरी, अनिल पाटील, भरत चौधरी, अजहर खाटीक, ऍड. भरत चौधरी, प्रवीण लोणारी, सुनील बारी, सागर बोरसे, पिंटू कुंभार, संतोष वाघ आदींसह अन्य शिवसैनिकांच्या स्वाक्षर्या आहेत.