कोथळी येथे बंद घर फोडून साडेचार लाखाचा मुद्देमालाची चोरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील कोथळी येथे बंद घराचे कडी व कोयंडा तोडून कपाटातील ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद धोंडू शिंदे वय 34 रा. कोथळी ता. मुक्ताईनगर हे वरणगाव फॅक्टरीत  नोकरीला आहे. आपल्या कुटुंबीयांसह कोथळी येथे वास्तव्याला आहे. दिवाळीनिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स आणि ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८३ हजार १७० रुपयांचा ऐवज लांबवलाचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी विनोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परविन तडवी करीत आहे.

Protected Content