यावल प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रावर वशिल्याने लसीकरण होत असल्याचा आरोप करत स्त्री-पुरूषांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ केल्याची घटना आज घडली.
याबाबत सविस्तर असे की, साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आज दि.२७ रोजी कोरोना प्रतिबंधकलसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. लसीकरण केंद्रावर फक्त शंभरच लस उपलब्ध होत्या.भल्या पहाटे पाच वाजेपासून नागरिकांनी लस घेण्यासाठी रांगा लावलेल्या होत्या. सकाळी जवळपास साडे-दहा वाजेपासून लसीकरणस सुरुवात झाली होती. त्यावेळी पाच-पाच नागरिक लसीकरणासाठी केंद्रात जात होते त्यादरम्यान केंद्राबाहेर रांगेत उभे राहात मागे-पुढे होण्यावरून नागरिकांचे किरकोळ वाद होत होते.तेव्हा शेवटच्या टप्प्यात अंदाजे पंधरा ते वीस डोस शिल्लक असतांना काही जण रांगेत उभे न राहता वशिल्याने लस घेऊन जात असल्याचे दिसून आले. या कारणास्तव नागरिक आरोप करीत ६० ते ७० नागरिकांचा मोठा गोंधळ निर्माण झाला.
यावेळी केंद्राच्या लोखंडी प्रवेशद्वारामधून अर्धवट उघड्या भागातून वयोवृद्ध महिलांसह अनेक महिला – पुरुष नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत दाटीवाटीने व लोटालोटी करत केंद्रामध्ये घुसले. यावेळी अक्षरशः एक-दोन वयोवृद्ध महिला सुद्धा खाली पडल्या. त्यामुळे येथे काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला काही नागरिकांनी सकाळपासून रांगेत नंबर लावलेले होते मात्र त्यांचे लसीकरण न झाल्याने ते नागरिक एकच आरडाओरड करीत होते. दरम्यान यावेळी केंद्रावर एकही पोलीस कर्मचारी अथवा होमगार्ड हजर नव्हता
दरम्यान केंद्राकरील गोंधळाची परिस्थिती पाहता केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले व त्यांचे आरोग्य कर्मचारी नागरिकांना शांत करीत होते. नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न करत होते मात्र नागरिक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने काही काळ लसीकरण बंद करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित नागरिकांना लसीकरण झाले तर काही जणांना लस न मिळाल्याने घरी माघारी जावे लागले.
साकळी येथील लसीकरण केंद्रावर मोजकीच लस येत असल्याने येथील लसीकरण कार्यक्रमाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ उडालेला आहे. त्याचप्रमाणे सध्या आठवड्यातून एकच दिवस उपलब्ध होत असते लस उपलब्ध संख्येपेक्षा कित्येक पटीने नागरिक केंद्रावर हजर असतात ही बाब नेहमीची बनली आहे. त्यामुळे केंद्रावर अनेकदा वादाचे प्रकार होत असतात.
साकळी प्रा.आ.केंद्राअंतर्गत परिसरातील अनेक गावे येत असतात त्यामुळे या केंद्रावर लस घेणार्या नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.तरुण वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात मात्र लस मोजक्याच उपलब्ध असल्याने अनेकांना लस न मिळाल्याने नाराज होऊन माघारी फिरावे लागते नोकरी व शिक्षण, रोजगाराच्या निमित्ताने अनेक तरुणांना बाहेर गावी जावे लागते त्या ठिकाणी लस घेतल्याचा पुरावा लागतो त्यामुळे तरुणांना प्राधान्यक्रमाने लसीकरण होणे गरजेचे आहे.
लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी-साकळी व त्या अंतर्गत येणार्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरणास मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे साकळीसह सर्वच ठिकाणच्या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. लस मलाच मिळावी ही स्वाभाविकपणे प्रत्येक नागरिकाची मानसिकता आहे परंतु लस कमी उपलब्ध होत असल्याने आरोग्य प्रशासनाला ताण येतो व नागरिकांच्या संतापाला नेहमी सामोरे जावे लागत असते.तसेच केंद्रातील कर्मचारी वर्गाचा स्टॉफ अपूर्ण असल्याने नागरिकांना आवरणे मुश्किल होऊन जाते.कोरोनाच्या कठीण प्रसंगात आरोग्य प्रशासनाला लसीकरणा सह इतरही कामकाजाला सामोरे जावे लागत असते व नागरिकांना आरोग्यसेवा द्यावी लागते.अशी प्रतिक्रीया वैद्यकिय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी दिली.