वाळू माफियांची दांडगाई ! : प्रांताधिकार्‍यांच्या शासकीय वाहनास दिली धडक

यावल प्रतिनिधी । अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनाचा पाठलाग करणारे प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या शासकीय वाहनाला वाळू तस्करांच्या डंपरने धडक दिल्याची धक्कादायक घटना रात्री घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री वाळू माफियांचा पाठलाग करणार्‍या फैजपूर विभागीय अधिकार्‍यांच्या (प्रांताधिकार्‍यांच्या) गाडीला बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याची खळबळजनक घटना काल रात्री उशिरा यावल तालुक्यातील न्हावी जवळ घडली. यावेळी विभागिय अधिकार्‍यांचा जीपचा चालक जखमी झाला असून शासकीय गाडीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी वाळू वाहतूक करणारा डंपर,त्यावरील चालक आणि सोबत असणारी कार ताब्यात घेण्यात आली असून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती उपविभागीय महसूल अधिकारी कैलास कडलग यांनी लाईव्ह ट्रेंड न्युजशी बोलताना दिली.ते म्हणाले की, काल (ता २४) रात्री उशिरा अकराच्या सुमारास बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही आपल्या शासकीय वाहनातून चालक उमेशसह या डंपरचा पाठलाग यावल- किनगांव दरम्यान केला. मात्र अंधाराचा फायदा घेत हा डंपर किनगाव भागात पळून जाण्यात यशस्वी झाला.

दरम्यान, तेथून परत येताना प्रांताधिकारी कडलग यांना न्हावी गावाकडे एक वाळू वाहतूक करणारा डंपर जाताना दिसला. त्यांनी या डंपरचा पाठलाग करतात डंपर सुसाट वेगाने न्हावी गावातील अडचणीच्या अरुंद गल्लीत शिरला. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात डंपर रिव्हर्स नेताना शासकीय गाडीला पुढून जोरात धक्का लागून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे वाहन चालक उमेश यांनाही झालेल्या ओढाताणीत वाळूमाफियांनी धक्काबुक्की केली असून त्यांना मुका मार लागलेला आहे.

या प्रकरणी या डंपरला संरक्षण देणार्‍या पांढर्‍या कारसह डंपरला ताब्यात घेण्यात आले आहे. सुसाट वेगाने डंपर चालवणार्‍या अठरा एकोणीस वर्षाच्या युवकाला ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

विना क्रमांकाच्या या डंपर्समधून वाळू वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने होत असल्याचे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करण्याची अपेक्षा महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडून व्यक्त होत आहे.

Protected Content