यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून निर्माण झालेल्या वादातून रात्री दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगविले. यानंतर समाजकंटकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल शहरात एका समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची तक्रार करीत असतांना मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र झाला. दरम्यान, हा जमाव पोलीस ठाण्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी शहरातील बुरूज चौकात जमावाला थांबवत परत जाण्याच्या सूचना केल्या मात्र जमाव पांगत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे काल रात्री शहरात दंगल सदृश्य स्थितीसह तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे हे देखील शहरात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीसांचा शहरातील विविध भागात बंदोबस्त , तैनात करण्यात आला असून वातावरण निवळले आहे. तर रात्रीपासूनच या तणावाला कारणीभूत असणार्यांची ओळख पटवून त्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे. यावल शहरात शांत वातावरण असून नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांनी केले आहे.