हिस्से वाटणीवरून दोन गटांमध्ये हाणामारी : परस्पर विरोधी गुन्हे दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अट्रावल येथे हिस्से वाटणीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

तालुक्यातील अट्रावल येथील संगीता चंद्रकांत चौधरी (वय ३९) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी रात्री ९ वाजता त्यांच्या घराच्या ओट्यावर शाम चौधरी, योगिता चौधरी, गिरीश चौधरी, रोशन चौधरी, गोलू उर्फ योगेश चौधरी, चंद्रकांत चौधरी व प्रतिभा चौधरी सर्व रा. अट्रावल हे आले. त्यांनी वडिलोपार्जित शेती घर व जागा यांच्या हिस्सा वाटणीच्या कारणावरून संगीता चौधरी व त्यांची मुलगी रुचिता चौधरी यांना शिवीगाळ व चापटबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, दुसरी फिर्याद योगिता शाम चौधरी (वय ४१) यांनी दिली. त्यानुसार अट्रावल येथे शनिवारी रात्री नऊ वाजता पौर्णिमा चौधरी व रुचिता चौधरी यांनी घराचे हिस्सा वाटणीच्या कारणावरून योगिता चौधरी यांना शिवीगाळ केली. तसेच पौर्णिमा चौधरी हिने योगिता चौधरी यांच्या डोक्यावर तसेच डोळ्याच्या बाजूला मारहाण करून दुखापत केली. तसेच रुचिता चौधरी हिने गिरीश चौधरी यांना शिवीगाळ व चापट बुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करत आहेत.

Protected Content