यावलमध्ये शेतकरी संघाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य, दोनदा लागली आग

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचा स्वच्छतेचा उत्कृष्ट पुरस्कार मिळवलेल्या यावल नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातच सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या आवारात अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या संदर्भात तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.

यावल शहरातील यावल तालुका शेतकरी सहकारी संघाच्या संरक्षण भिंतीलगत काही रहिवासी घरं आहेत. या घरांमधील काही नागरिकांकडून संघाच्या आवारात बेजबाबदारीने कचरा टाकण्यात येतो. दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिगारे साचल्याने परिसरात अस्वच्छता आणि आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या साचलेल्या कचऱ्याने दोन दिवसांपूर्वी अचानक पेट घेतला. या ठिकाणी “स्टार फिटनेस” नावाची व्यायामशाळा असून, व्यायाम करणाऱ्या तरुणांनी आग लागल्याची माहिती नगरपरिषदेला दिली. तत्काळ नगरपरिषदेकडून अग्निशमन दल पाठवण्यात आले आणि आग आटोक्यात आणली गेली.

मात्र, या घटना इथेच थांबलेल्या नाहीत. मागील सहा दिवसांत जिनिंग परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला दोन वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे व्यायामशाळेतील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषदेच्या दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षी यावल नगरपरिषदेला स्वच्छतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि संपूर्ण शहरात याचे कौतुक करण्यात आले होते. मात्र, अशा घटनांमुळे नगरपरिषदेच्या प्रतिमेला धक्का बसत आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते उमेश फेगडे यांनी नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य अधिकारी सत्यम पाटील यांच्याशी त्वरीत संपर्क साधला. त्यांनी संघाच्या आवारात दुर्गंधीयुक्त कचरा टाकणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही नागरिकांच्या बेपर्वा वागणुकीमुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छता आणि आगजनीसारखे प्रकार घडत आहेत, हे शहराच्या स्वच्छतेच्या प्रतिमेला योग्य नाही.

Protected Content