केळी व्यापार्‍याकडून शेतकर्‍याच्या फसवणुकीचा प्रयत्न फसला

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथील शेतकर्‍याच्या केळीच्या चांगल्या प्रतिच्या घडांना कापून फसवणुकीचा प्रयत्न फसला असून सदर व्यापार्‍याला कृषी उत्पन्न बाजार समितीने दंड ठोठावला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, डांभुर्णी येथील केळी उत्पादक पुरूजीत चौधरी यांनी धरणगाव येथील जावेद रहीम बागवान या व्यापार्‍यासोबत केळी बागेतील दुय्यम प्रतीच्या केळीचे घड देण्याबाबत चा सौदा केला होता. मात्र व्यापार्‍याने बागेतील उच्च प्रतीचे घड कापले. पुरूजीत चौधरी यांनी शेतात जाऊन पाहिले असता व्यापार्‍याने उच्च प्रतीचे घड कापल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर दुय्यम प्रतीच्या केळी घडाचे रकमेनुसार २४हजार ७८८ रुपयाचे बिल तयार केले.

या प्रकरणी केळी उत्पादक पुरूजीत चौधरी यांनी तात्काळ बाजार समितीकडे तक्रार दिली असता बाजार समितीच्या निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहिले. यात त्यांना तक्रारीत तथ्य आढळून आले. या अनुषंगाने बाजार समितीच्या निरीक्षकाने कृउबाचे सभापती हर्षल गोविंदा पाटील, संचालक राकेश वसंत फेगडे, उज्जैनसिंग, सचिव स्वप्नील सोनवणे यांच्या समक्ष पंचनामा केला.

सभापती व संचालक मंडळांने शेतकर्‍यास उच्च प्रतीच्या मालानुसार ३४हजार ४४० रुपये, देण्याचे आदेश देत २१ हजार रुपयाचा व्यापार्‍यास दंड आकारला. दरम्यान, सदर व्यापार्‍याने कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी फरकाची रक्कम व दंडाची रक्कम भरण्याचे मान्य करत बाजार समितीला यापुढे अशी चूक करणार नसल्याचे नमूद करत माफीनामा लिहून दिला. बाजार समितीच्या या कारवाईने शेतकर्‍याचे होणारे दहा हजार रुपयांचे नुकसान टळले आहे. बाजार समितीच्या या कारवाईने तालुक्यातील केळी उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Protected Content