Home Cities यावल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी यावल तालुका काँग्रेस सज्ज; एकजुटीच्या बळावर विजयाचा निर्धार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी यावल तालुका काँग्रेस सज्ज; एकजुटीच्या बळावर विजयाचा निर्धार


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका काँग्रेसने विजयाचा बिगुल वाजवला आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक तयारी पूर्ण केली असून कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि ठोस रणनितीच्या जोरावर आगामी निवडणुकीत यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

यावल येथे झालेल्या काँग्रेस आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरिझ बेग मिर्झा यांच्या निरीक्षणाखाली आणि महासचिव तसेच रावेर–यावल मतदारसंघ प्रभारी डॉ. अरविंद कोलते यांच्या नेतृत्वाखाली चर्चा पार पडली. या बैठकीस यावल तालुका, यावल शहर आणि फैजपूर शहर काँग्रेस समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान विभागनिहाय आढावा, मतदारसंघानुसार रणनीती आणि जनतेच्या अपेक्षांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बळकटीसाठी आवश्यक उपाय, स्थानिक अडचणी व निवडणुकीतील संधी यावर उत्साहाने मते मांडली. या चर्चेतून स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनातील समन्वय स्पष्टपणे जाणवला.

प्रभारी डॉ. अरविंद कोलते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्थानिक समित्यांना जमिनीच्या पातळीवर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. निवडणुका स्वतंत्रपणे लढवायच्या की आघाडीतून, याचा निर्णय स्थानिक परिस्थिती आणि संघटनेच्या सामर्थ्यानुसार घेतला जाईल.” त्यांनी यावल तालुका काँग्रेसची शिस्त, एकजूट आणि सजगता कौतुकास्पद असल्याचे सांगितले आणि हे संघटनात्मक बळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससाठी आदर्श ठरू शकते, असेही मत व्यक्त केले.

या बैठकीला माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी, तालुकाध्यक्ष शेखर सोपान पाटील, माजी सदस्य विलास तायडे, फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख, यावल शहराध्यक्ष हकीम शेठ, तसेच माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी, सुनिल फिरके, जावेद अली जनाब, कलीम खान, उमाकांत पाटील, राहुल मोरे, सतिश पाटील यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावल तालुका काँग्रेसच्या या बैठकीने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना वेग आला असून, संघटनात्मक एकतेच्या बळावर पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये विजयाचा निर्धार स्पष्ट केला आहे.

 


Protected Content

Play sound